सांगली

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ मधील विविध कामांचा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक सागर गवते, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील आदिंसह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ मधील वितरीत निधीचा योग्य व पारदर्शक वापर होणे अत्यावश्यक असून, कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. पूर्ण झालेल्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र, गुणवत्तापूर्ण कामाचे प्रमाणपत्र तसेच काम पूर्ण झाल्याचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत आयपास प्रणालीवर अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित कामांसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधीची तरतूद करण्यात यावी. राज्यस्तरीय यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही जुलैपूर्वी पूर्ण करावी. योजनानिहाय खर्चाचे नियोजन अचूक ठेवून निधीची योग्य विभागणी करावी. महालेखापाल कार्यालयास सादर करावयाच्या प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रांची पूर्तता तातडीने करावी. तसेच MHUID अंतर्गत मंजूर कामांसाठी युनिक आयडी तयार करून प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले.

यावेळी सन २०२५-२६ अंतर्गत मंजूर कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सादर करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रस्तावांबाबतही चर्चा करण्यात आली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *