महाराष्ट्र मुंबई शहर

राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप

राज्यात पत्रकारांचा आवाज बंद करून ‘कोंडी’चा प्रयत्न

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा गंभीर आरोप

मुंबई- महाराष्ट्रात पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय.. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ करण्याच्या घटना सातत्यानं समोर येताहेत. एकीकडे विविध प्रकारे पत्रकारांचा आवाज बंद करायचा आणि त्याच वेळेस पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करायची नाही असं सुरू आहे.. हेतुत: कोंडी केली जातेय पत्रकारांची . पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी काही उदाहरणे देऊन केला त्यातील दोन-तीन ताज्या घटना आहेत.

                         अकोला येथील पाच पत्रकारांना हक्कभंग समितीने पाच दिवसांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.. यात ‘टीव्ही 9’ चे अकोला बातमीदार गणेश सोनोने, त्यांची पत्नी ‘साम’ बातमीदार हर्षदा सोनोने यांच्यासह अन्य चार जणांचा समावेश आहे.. अमोल मिटकरी यांच्या संदर्भात एक वस्तुनिष्ठ बातमी त्यांनी दिली होती, त्याची ही शिक्षा.. म्हणजे तुम्ही आमदारांच्या विरोधात सत्य बातम्या देखील द्यायच्या नाहीत हा इशारा देण्याचा हा प्रयत्न आहे.. हे भयंकर आहे.. दुसरी घटना नांदेडची.. मुक्ता कदम या मुक्त पत्रकाराने नांदेड मनपा निवडणूक काळात पाणी, स्वच्छता, आरोग्य आदि प्रश्नांवर फोकस करून जनहिताच्या बातम्या दिल्या होत्या.. या बातम्यांमुळे निवडणूक आचारसंहितेचा कसा भंग होतो, माहिती नाही, किंबहुना तेच पत्रकारांचे काम आहे.. असं असतानाही त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतोय.. पत्रकार दत्तात्रय खेमनर- हे नाव आता सर्वांना माहिती झालंय.. श्रीरामपूरच्या या धाडसी पत्रकाराने सर्वप्रथम लिंगपिसाट अशोक खरात यांला नागडं करण्याचा प्रयत्न केला..

                  खेमनरच्या बातमीची दखल घेऊन वेळीच सरकारनं कारवाई केली असती तर महिलांच्या अब्रुचे निघणारे धिंडवडे थांबवता आले असते.. असं झालं नाही.. बातमी येताच महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खेमनर यांना फोन करून दम दिला, गुन्हा दाखल करण्याची, त्यांचे ‘खबरदार पुढारी’ हे वृत्तपत्र बंद करण्याची धमकी दिली.. का बाबा? ही मोगलाई आहे का? नाही.. पण अनेक पुढाऱ्यांची वागणूक तशीच असते ..पत्रकारांना अद्दल घडविली पाहिजे असंच अनेकांना वाटतं.. तसा ते प्रयत्न करतात.. आजही दत्तात्रय खेमनर यांच्या जिविताला धोका आहे.. पोलिसांनी त्यांना आता संरक्षण दिलंय.. महाराष्ट्रात सत्य आणि निष्पक्ष पत्रकारिता करणे किती कठीण आहे याची ही तीन ताजी उदाहरणं…. तिन्ही प्रकरणात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संबंधीत पत्रकारांबरोबर आहे……

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *