सातारा

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन

सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो

99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मुख्य मंडपात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात अनेक नामवंत कवींनी आपल्या भावना शब्दांमधून प्रकट करत कवितांचे सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्यातील वाई येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते.

तब्बल चार चालेल्या या कविसंमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातील कवींनी आपली प्रतिभा दर्शवित उत्तमोत्तम कविता सादर केल्या. कवी विठ्ठल वाघ, माजी आमदार कांता नलावडे, इंद्रजीत भालेराव, रयत शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत दळवी यांच्यासह असंख्य काव्यप्रेमींनी या कविसंमेलनाचा भरभरून आस्वाद घेत सादरीकरणाला दिलखुलास दाद दिली. प्रदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘मराठीची मुक्ताक्षरे आपण विसरत चाललोय’ या ओळींनी अशोक नायगावकर यांनी कवी संमेलनाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘तेव्हा क कमळाचा होता थ खरा वाटायचा थुई थुई मोरासारखा नाचायचा, प परत ये परत ये म्हणत पारंबीवर राहायचा. फ फावल्या वेळाचा होता अशी ही सगळी मुळाक्षरे बाराखडी मोजत बसले आहेत’, या काव्यपंक्ती ऐकविल्या.

‘माझ्या उलट्या कडीचे घर सादर होताना ..लोक भलेही लपवून ठेवू त्यात सोने आणि ताळेबंद मी खेळत्या वयात भाकरी लपवली उद्यासाठी..’ ही कविता सादर करताना छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे यांनी जीवनाचे दर्शन घडवले. धाराशिव येथील कवी डी. के. शेख यांनी ‘तुझ्यामुळे गे, तुझ्यामुळे ..डोक्यावरचे केस गळाले..’ ही कविता सादर केली तेव्हा संपूर्ण मंडप हास्यरसात बुडला. हे काव्य ऐकल्यावर अशोक नायगावकर यांनी बायको मुळे तुम्हाला केस पुन्हा येवोत अशी सदिच्छा दिली. यानंतर अनिता एलबोटे यांची पूर्वीसारखी आजी आता लावत नाही कडी कुलूप, ज्योती कपिले यांनी ‘मोकळा आभाळ’ तर कमलाकर राऊत यांनी ‘मिळे मानवी जन्म एकदा धरतीच्या दरबारी’ ही कविता तर मनोज वराडे यांनी ‘नाय जीव देणार नाही ही देवाला साद घालणारी’ ही भावपूर्ण कविता सादर केली.

चंद्रपूरच्या प्रदीप देशमुख यांनी वऱ्हाडी भाषेची गोडी दर्शविताना ‘असा आयुष्य वढाय चाले म्हणाले मोडून’ हे काव्य सादर करून काव्यप्रेमींची मने जिंकली. गडचिरोली येथील चुडामण बल्लारपुरे यांनी ‘रानगर्भातील रानफुले’ ही कविता ऐकविताना विदर्भी भाषेचा ठसका दर्शविला. ‘ना कर्त्यांना युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसतो’ ही कविता ऐकविताना सुनील यावलीकर कटू सत्य मांडले. भोपाळ येथील कवी विवेक सावरीकर यांनी ‘मन माझे मराठी देशपालथा केला फिरता फिरता, अजूनच शोधतो आईची उशी ,क्रोकरी जरी किमती असली तरी आवडते कपबशी’ ही अर्थवाही कविता सादर केली. सातारची माहेरवाशीण असलेल्या माजी आमदार कांता नलावडे यांनी सामाजिक प्रश्नावर काव्य सादर करताना स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराचा गंभीर प्रश्र्न मांडणारी मुक्तछंदातील देवाला आव्हान करणारी ‘यक्षप्रश्न’ ही कविता सादर केली तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या.

अशोक नायगावकर यांचा संयोजकांच्या वतीने कंदीपेढ्याचा हार आणि शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शोभाताई नायगावकर यांनाही गौरविण्यात आले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *