सातारा

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ

सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट

सातारा / सप्त नगरी न्युज

पालकांना वाचनाचे महत्व कळावे या हेतूने विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत २० कि.मी. संमेलनस्थळी आणणारी जिल्हा परिषदेची शाळा, वाचनाचे संस्कार घडावेत म्हणून पारधी वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना संमेलनात आणणारी सामाजिक संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून शकडो विद्यार्थी आणि पालक, शिक्षकांनी संमेलनस्थळी भेटी देत साहित्य संमेलनातील उपक्रम जाणून घेतले.

तासगाव या छोट्याशा गावात वाचन संस्कृती म्हणावी तशी रुजलेली नाही. या गावातील लोकांना वाचनाचे महत्व कळल्यास वाचनाची आवड ते पुढील पिढीत प्रवाहित करू शकतील. या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तासगावचे शिक्षक संदीप मोहिते यांनी संमेलनाआधी पालकांची सभा घेत संमेलनाविषयी माहिती दिली. मुले संमेलनात सहभागी झाल्यास त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होऊ शकेल ज्या योगे त्यांची सर्वांगिण प्रगती होईल हा संदेश त्यांनी पालकांपर्यंत पोहोचविला. मोहिते यांची विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयीची कळकळ समजून घेऊन पालकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. यातूनच तासगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांसह मोठ्या संख्येने संमेलनस्थळी उपस्थिती लावत संमेलनाविषयी जाणून घेतले.

मला वाचनाची अजिबात आवड नव्हती, पण शिक्षकांनी आम्हाला वाचनाचे महत्व पटवून दिले आणि संमेलनात आणले. इथे आल्यानंतर भरपूर पुस्तके, उत्साही वातावरण पाहून आपण आपल्या आयुष्यात काही तरी गमावले आहे, अशी भावना निर्माण झाली. आता मी माझ्या मुलाला अवांतर वाचनासाठी प्रोत्साहन देईन, असे मत अहमद मुल्ला या पालकांनी व्यक्त केले. मुल्ला यांचा मुलगा प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे.

कोमल महाडिक या पालकदेखील आपल्या ४थी आणि पहिलीत शिकणाऱ्या मुलांना घेऊन संमेलन भेटीसाठी आल्या होत्या.

शिक्षणाचा अधिकार जसा सर्व स्तरातील मुलांचा आहे तसेच सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी देखील निर्माण व्हायला हवी, या हेतूने ‘आठवडे शाळा’ हा उपक्रम राबवणारे शिक्षक माणिक शेडगे यांनी कोरेगाव तालुक्यातील पारध्यांच्या वस्तीवरील ५० मुलांना संमेलन स्थळ दाखविण्यासाठी आवर्जून आणले. शेडगे म्हणाले, हे विद्यार्थी त्यांच्या वस्ती जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतात. त्यांच्यावर वाचनाचे संस्कार व्हावेत, पाठ्यपुस्तकाशिवाय इतर पुस्तके त्यांनी वाचावीत म्हणून आम्ही विविध उपक्रम घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या मुलांना संमेलनात आणले.

वाघोली येथील पी. एम. श्री आंबवडे शाळेतील विद्यार्थी १६ कि. मी. अंतरावरून संमेलन अनुभवण्यासाठी आले होते. संमेलन काय असते, पुस्तक प्रदर्शनात विविध विषयांवरील किती तरी पुस्तके पहायला मिळतात, बाल साहित्य म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना कळते म्हणून त्यांना संमेलनस्थळी घेऊन आलो आहोत, अशी माहिती शाळेच्या शिक्षिका वैशाली डोईफोडे यांनी दिली.

रयत शिक्षण संस्थेची अण्णासाहेब कल्याणी शाळा, भीमाबाई आंबेडकर शासकीय विद्यालय अशा बऱ्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी संमेलनास भेट दिली. जिल्ह्यातील इतर शाळाही विद्यार्थ्यांना टप्पा टप्प्याने संमेलनस्थळी आणणार आहेत.

वाचन संस्कृती वाढावी, मुलांना पुस्तकांची गोडी लागावी, ज्या योगे त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल ही तळमळ ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे, ही बाब मराठी भाषा प्रवाही राहण्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. संमेलनस्थळी मुले एकत्रित येऊन आपआपली आवडती पुस्तके वाचत होती. त्यांच्या डोळ्यातील जिज्ञासा, उत्सुकता सकारात्मकतेचा सुगंध संमेलन स्थळावर पसरवित होती. पुस्तकांमध्ये रमलेली मुले पाहून संमेलनाला भेटी देणारे नागरिक कौतुकाने हे दृश्य न्याहाळत होते. सातारा शहरात झालेल्या संमेलनामुळे जिल्ह्यातील विविध शाळांतून विद्यार्थ्यांना साहित्याचे दालन खुले झाले आहे हा संमेलनाचा सकारात्मक प्रभाव आहे असे विश्वासार्ह चित्र निर्माण झाले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *