मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे
6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीला आवाहन

6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” हे नियतकालिक सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया घातला.. त्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” किंवा “दर्पण दिन” म्हणून साजरा केला जातो.. अनेकांचा गैरसमज असा आहे की, ६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस असल्याने तो दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो..गुगलवर देखील 6 जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिवस असल्याचे म्हटले आहे.. हे खरं नाही..धादांत चूक आहे.. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी पोंभुर्ले येथे झाला.. मृत्यू 17 मे 1848 रोजी झाला.. बाळशास्त्री जांभेकर यांचा समावेश महनिय व्यक्तींमध्ये झालेला असल्याने सरकार देखील 20 फेब्रुवारी रोजीच बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करते.. सरकारने काही वर्षांपुर्वी तसा जीआर देखील काढलेला आहे.. दर्पण सुरू झाले या घटनेला आता 194 वर्षे झाली आहेत.. म्हणूनच 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील महत्वाचा दिवस समजला जातो.. गुगलवर चार – पाच वेगवेगळे फोटो आहेत.. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, बाळशास्त्रीचं निधन वयाच्या 33 व्या वर्षी झालं.. म्हणजे ते तरूण होते.. ते अल्पशा आजारानं गेले.. ते नियमित व्यायाम करायचे त्यामुळे त्यांची शरीरयष्ठी तशी दणकट होती.. विद्वत्तेचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.. परंतू गुगलवर जे फोटो दिसतात त्यात बाळशास्त्री म्हातारे, खंगलेले वाटतात.. निस्तेज दिसतात.. फारसा विचार न करता ही चित्रं रेखाटलेली आहेत.. त्यामुळे ती बाळशास्त्री जांभेकर यांच्या व्यक्तीमत्वाच्या जवळही पोहचत नाहीत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेनं 1998 मध्ये बाळशास्त्रीं जांभेकर यांचं एक चित्र काढून घेतले आहे.. प्रसिद्ध चित्रकार मुकुंद बहुलेकर यांनी रेखाटलेल्या या चित्राचं प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं.. चित्र बघताच बाळासाहेब ठाकरे म्हणाले, हेच खरे बाळशास्त्री.. त्यांनी मुकुंद बहुलेकर यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचं कौतूक केलं, त्यांचा सत्कारही केला.. बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा विख्यात कलाकारांनी मान्यता दिलेले छायाचित्र अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद वापरते..सरकारी अधिकाऱ्यांना या सर्वांचं भान नाही.. 6 जानेवारीच्या जाहिरातीत सरकार दरवर्षी वेगवेगळे छायाचित्र वापरते.. या संदर्भात माहिती आणि जनसंपर्क विभागाकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला मात्र त्यांना फरक पडत नाही.. सर्वांना आमची विनंती आहे की, 6 जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्म दिवस आहे अशा पोस्ट कोणी करू नयेत, शिवाय या प्रसिद्धीपत्रकासोबत दिलेले छायाचित्र सर्वत्र वापरले जावे.. असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





